उद्धव ठाकरेंना मागे बसवल्याचा वाद! सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला, म्हणाले, पवारसाहेबही….

Supriya Sule : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६ ते ८ ऑगस्टच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वाद उफाळला आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या अनौपचारिक बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागील रांगेत बसल्याच्या फोटोंवरून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपने टीकास्त्र सोडले.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि केशव उपाध्ये यांनी “उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची लाज घालवली” आणि “हिंदुत्व सोडून शेवटच्या रांगेत बसले” अशा शब्दांत हल्ला चढवला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळेंचा पलटवार
सुप्रिया सुळे यांनी हा वाद हास्यास्पद आणि बालिश असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या, “ही अनौपचारिक बैठक होती, काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. शरद पवार साहेबही मागे बसले होते, अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत होते. ज्याला जिथे जागा मिळाली, तिथे ते बसले. सिनेमागृहात तुम्ही पुढे बसता की मागे, असा प्रश्न आहे का? सत्ताधाऱ्यांनी कधी सिनेमा पाहिलेला नसेल!” सुळे यांनी या टीकेची तुलना सिनेमाच्या अनुभवाशी करत महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला.
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या बैठकीत निवडणूक आयोग आणि मतदार यादीतील घोळावर प्रेझेंटेशन देण्यात आले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. संजय राऊत यांनी यापूर्वी स्पष्ट केले की, प्रेझेंटेशन नीट पाहण्यासाठी स्क्रीनमुळे मागे बसावे लागले, हा अपमानाचा मुद्दा नाही.
राईट टू प्रायव्हसीवर सुळेंचे भाष्य
सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या रेव्ह पार्टी प्रकरणावरही भाष्य केले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह सामग्री असल्याचा दावा केला होता. यावर सुळे म्हणाल्या, “खेवलकर यांचा पक्षाशी संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन होऊ नये. कोणाचा मोबाइल फक्त पोलिस आणि कोर्टालाच दाखवला जाऊ शकतो. आम्ही कोणाच्या कुटुंबावर टीका करत नाही, पण सत्ताधारी वैयक्तिक हल्ले करत आहेत.”





