NCP Merger : अजित पवार विलिनीकरणाबाबत माझ्याशी बोलले होते; ‘या’ आमदाराने केला दावा
राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून (NCP Merger) जोरदार चर्चा सुरू असून, रोज नवनवीन दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

NCP Merger : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून (NCP Merger) जोरदार चर्चा सुरू असून, रोज नवनवीन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असला, तरी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केलेल्या एका खळबळजनक गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
मिरज येथे माध्यमांशी संवाद साधताना नायकवाडी यांनी दावा केला की, निधनाच्या काही दिवस आधी अजित पवारांची आणि त्यांची भेट झाली होती. त्या भेटीत अजितदादांनी आपल्या पक्षात नसलेल्या एका सहकाऱ्यासोबतचे संबंध कसे आहेत, अशी विचारणा केली होती. त्यावर नायकवाडी यांनी ‘कशासाठी?’ असा प्रतिप्रश्न केला असता, ‘भविष्यात आपल्याला एकत्र (NCP Merger) यावं लागेल,’ असं अत्यंत सूचक विधान अजितदादांनी केल्याचं नायकवाडी यांनी सांगितलं.
अजितदादा जिवंत असतानाच दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू होत्या, असंही नायकवाडी यांनी स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या सर्व शक्यता फेटाळून लावत विलिनीकरणाचा विषय आपल्यासाठी संपल्याचं जाहीर केलं आहे. माझा भाऊ गेला तिथेच हा विषय संपला असून, आमच्याकडून कोणीही चर्चा करत नाही आणि समोरूनही कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संसदेत आणि विविध समित्यांच्या बैठकांमध्ये सर्व खासदार एकत्र येतात आणि भेटतात, याचा अर्थ तिथे विलिनीकरणावर चर्चा होते असा होत नाही, असं म्हणत सुळे यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
या सर्व राजकीय घडामोडी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाल्याने या बैठकीत विलिनीकरणाच्या (NCP Merger) मुद्द्यावर खलबतं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, मात्र अद्याप या वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.






