Rupali Chakankar : निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला राजीनामा मागतायत; रुपाली चाकणकरांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर

Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणावरून सुरू असलेल्या टीकेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधक महिला आयोगाच्या कारभारावर सातत्याने टीका करत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळालं. त्यामुळे आज टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी ठरवावं की नेमकं काय बोलायचं आहे.”
तसेच “महिला आयोगावर टीका करणाऱ्यांमध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या निवडणुकीनंतर राजकारणाच्या अडगळीत पडल्या आहेत. आता त्यांना कुणी विचारत नाही, म्हणून प्रसिद्धीसाठी त्या माझ्यावर टीका करत आहेत, असा टोलाही रुपाली चाकणकर यांनी यावेळी लगावला.
फुके प्रकरणातील महिलेच्या पत्राविषयी विचारले असता, “अशा प्रकारची कोणतीही तक्रार मला मिळालेली नाही. आयोगाच्या कार्यालयात टपाल आणि फोनसेवेच्या माध्यमातून तक्रारी घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. आयोगाचा नंबर बंद असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत,” असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिलं.
दरम्यान, मंगळवारी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपालांकडे महिला आयोगाच्या कारभाराविषयी तक्रार करण्यासाठी राजभवनात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांना प्रवेश नाकारल्याने त्या नाराज झाल्या.
तिवारी म्हणाल्या, “राजभवनात मला आत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली, जणू आम्ही आतंकवादी असल्यासारखं वागवलं गेलं.” या संपूर्ण प्रकरणावरून राज्य महिला आयोग, विरोधक आणि महिला नेत्यांमध्ये सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.





