शिवसेना-मनसे युतीवर संभ्रम: राज ठाकरेंचा बोलण्यास मनाईचा आदेश, उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीवर चर्चा थांबवण्याचे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. युतीबाबत कोणीही बोलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधावा, असे स्पष्ट निर्देश राज ठाकरे यांनी दिले. यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी, “चांगलंय ना… त्याच्यात काय, ते बोलतील ना त्यावर,” अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आज विधानभवनात माध्यमांशी बोलत होते. 5 जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये ठाकरे बंधूंचा मेळावा झाला, जिथे उद्धव यांनी “एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो” अशी भावनिक भूमिका मांडली. मात्र, राज ठाकरे यांनी युतीबाबत स्पष्टता दाखवली नाही.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “पक्षातील कोणीही वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. प्रवक्त्यांनीही माझ्या परवानगीशिवाय कोणतेही वक्तव्य करू नये.” मराठी माणसांची एकजूट आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले, पण युतीच्या भवितव्यासंदर्भात ठोस संकेत दिले नाहीत.
उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी पुढाकार घेतला असला तरी राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते 20 वर्षांनंतर एकत्र आले असले, तरी मनसे आणि ठाकरे गटाची युती प्रत्यक्षात येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीच्या भवितव्याबाबत राज ठाकरे यांचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.




