Supriya Sule : ‘माझा भाऊ गेला, त्याच दिवशी विलीनीकरणाचा विषय संपला’; सुप्रिया सुळेंकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.

Supriya Sule : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
‘माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला, असे भावनिक विधान करत त्यांनी या विषयाला पूर्णविराम दिला. तसेच विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे नसून, यासंदर्भात आपल्याशी कोणाचीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय घडामोडींमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. शरद पवार यांना देशातील सर्वच पक्षांचे नेते भेटत असतात.
अजित पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतरही त्या गटातील अनेक नेते, आमदार आणि मंत्री शरद पवार यांची भेट घेत असतात. त्यामुळे अशा भेटींमध्ये नवीन किंवा वावगे काही नाही, असे त्या म्हणाल्या.
अमित शहा यांची संबंधित नेत्यांनी घेतलेली भेट हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोण कोणाला आणि कशासाठी भेटते, हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याने त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.
विलिनीकरणाबाबत त्या म्हणाल्या, अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार यांनी स्वतः याबाबत आमच्याशी संवाद साधला होता.
१७ जानेवारीला गोविंदबाग येथे झालेल्या चर्चेचा व्हिडिओही सर्वांसमोर आहे. त्यामुळे या घडामोडी कोणापासून लपलेल्या नव्हत्या, मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांतच आपण या विषयावर पडदा टाकला. माझ्यासाठी भाऊ गेल्यानंतर हा विषय संपला आहे.
त्यामुळे आता त्यावर वेगळे काही बोलण्याचे कारण नाही, असे सांगत सुळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चावर अधिक भाष्य करणे टाळले. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा राजकीय पूर्णविराम मिळाला आहे.






