नवी दिल्ली – मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही स्पर्धक युवतींना कोविडने ग्रासले असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा सुरू होण्यास अगदीच थोडा अवधी बाकी असतानाच ही घोषणा करण्यात आली.
ही स्पर्धा प्युर्टोरिको येथे होणार होती. तेथेच या कोविडग्रस्त स्पर्धकांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील तीन महिन्याच्या कालावधीत ही स्पर्धा घेतली जाईल आणि त्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील असे आयोजकांनी म्हटले आहे.
स्पर्धेच्या आयोजक कर्मचाऱ्यांपैंकी काही जण तसेच काही स्पर्धक असे एकूण 17 जण कोविड पॉझिटीव्ह आढळल्याने आयोजकांनी हा निर्णय घेतला. या कोविडग्रस्त स्पर्धकांमध्ये भारताची मनसा वाराणसी हिचाही समावेश आहे. आरोग्य विभागाने अनुमती दिल्यास स्पर्धकांना मायदेशी पाठवले जाईल असे आयोजकांनी म्हटले आहे.