भाजप आमदाराचा दावा; निशाण्यावर स्वपक्षाचे केंद्रीय नेतृत्व
बंगळूर -कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना हटवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप बुधवारी सत्तारूढ भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी केला. त्या आरोपाच्या निशाण्यावर भाजपचेच केंद्रीय नेतृत्व असल्याने मोठीच राजकीय खळबळ उडाली आहे.
कर्नाटकला काही दिवसांपूर्वी पुराचा फटका बसला. त्यानंतर पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा निधी मिळण्यात विलंब झाल्यावरून पाटील काही दिवसांपासून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. ते करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अपवाद न केल्याने त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राग ओढवून घेतला. त्यांना नुकतीच पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली.
मात्र, त्याची तमा न बाळगता पाटील यांनी पुन्हा भाजप नेतृत्वावर आगपाखड केली. मुख्यमंत्रिपदी येडियुरप्पा नको असतील तर त्यांना बोलावून तसे सांगितले जावे. तुमचे (येडियुरप्पा) वय 77 वर्षे आहे. पदावर राहण्यासाठी ती बाब पक्षधोरणाच्या विरोधात आहे, असे त्यांना सांगितले जावे. त्यांचा राजीनामा घ्यावा आणि नव्या नेत्याची निवड करावी.
मात्र, तसे करण्याऐवजी कर्नाटकचा मदतनिधी रोखला जात आहे. तसेच, येडियुरप्पा यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना प्रोत्साहन दिले जात आहे, अशा आरोपांची सरबत्तीच पाटील यांनी केली.