Sangli Lok Sabha Election 2024 : मंगळवारी (दि. 9) महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 21, काॅंग्रेस पक्षाला 17 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 10 जागांचे वाटप करण्यात आले. तीन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली. त्यानुसार सांगली लोकसभा मतदार संघ (Sangli Lok Sabha Election 2024) ठाकरे यांच्याकडे गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.
मात्र तरीदेखील सांगलीच्या जागेवरुन काॅंग्रेसमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. काॅंग्रेस नेते विश्वजीत कदम (Congress leader Vishwajeet Kadam) यांनी आज (दि. 10) पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता आणि जनतेची भावना समजून घ्यावी. सांगलीच्या जागेबाबात फेरविचार करावा, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी केली.
महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली आहे. पण हा निर्णय आपल्याला पचनी पडणारा नाही, असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केलं.
काय म्हणाले विश्वजित कदम?
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो काँग्रेसकडेच राहावा यासाठी आम्ही दिल्लीपर्यंत प्रयत्न केले. त्यामध्ये ज्या ज्या वेळी बैठक होईल त्या त्या वेळी सांगलीच्या जागेवर चर्चा केली. सांगलीची जागा ही काँग्रेस पक्ष लढायला सक्षम असून ती आपल्यालाच मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळेच या जागेवर आम्ही दावा केला.
कोल्हापूरची जागा ही शाहू महाराजांसाठी काँग्रेसला देण्यात आली. त्यावेळी शिवसेनेने सांगलीच्या जागेवर दावा केला, आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. तो निर्णय एकतर्फी होता आणि इतर पक्षांना विचारण्यात आलं नाही अशी तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केला. सांगलीचा राजकीय इतिहास काय आहे, कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे हे जरी महाविकास आघाडीने लक्षात घेतलं असतं तर आजची ही परिस्थिती निर्माण झाली नसती. महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केलं आणि सांगलीची जागा शिवसेनेला गेली.
सांगलीची राजकीय परिस्थिती लक्षात घ्यावी आणि त्यावर फेरविचार करावा. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहोत यावर काही दुमत नाही. पण सांगलीच्या जागेवर पुन्हा निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही करतोय.
सांगली लोकसभेसाठी 7 मे ला मतदान –
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदावारी जाहीर झाली आहे. संजयकाका पाटील हे सलग दोन वेळा खासदार राहिले आहेत. आता तिसऱ्यांदा ते निवडणुक रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे कुस्तीपटू आहेत. या मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.