नवी दिल्ली – केरळात गेल्या वर्षी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला झालेल्या अपघातातील मृतांना आणि जखमींना एअर इंडिया एक्स्प्रेस विमान कंपनीकडून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याचे वाटप सुरू झाले आहे.
त्यानुसार 12 वर्षावरील मृतांना दहा लाख रूपये, बारा वर्षाखालील मृतांना पाच लाख रूपये, गंभीर जखमींना दोन लाख रूपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रूपये या प्रमाणात ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
या दुर्घटनेत विमानातील 19 प्रवासी व दोन पायलट ठार झाले होते. तर 165 विमान प्रवासी व चार कर्मचारी जखमी झाले होते. विमान कंपनीने जी नुकसान भरपाई देऊ केली आहे ती जखमींपैकी 80 जणांनी मान्य केली आहे. तर अन्य जखमींनी अजून या ऑफरला मंजुरी दिलेली नाही. तथापि आम्हाला ही नुकसान भरपाई मान्य नाही असे अजून कोणीही अधिकृतपणे कळवलेले नाही असे विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
7 ऑगस्ट 2020 साली या विमान कंपनीचे विमान दुबईतून येत असताना कोझीकोडे विमानतळावर ते धावपट्टीवरून घसरून पुढे गेले व पुढे ते दरीत कोसळले त्यामुळे ही दुर्घटना झाली. या नुकसानभरपाईच्या संबंधात जखमींचे काहीं म्हणणे असेल तर त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे.