पुणे – “द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया’तर्फे घेण्यात आलेल्या प्रोफेशनल व एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. संस्थेच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
दोन्ही परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आल्या. सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम परीक्षेत नव्या अभ्यासक्रमात इंदोरची आकांक्षा गुप्ता आणि जुन्या अभ्यासक्रमात जयपूरचा तन्मय अग्रवाल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. एक्झिक्युटिव्हच्या जुन्या अभ्यासक्रमाचा पहिल्या मोड्युलचा निकाल 15.21 टक्के, तर दुसऱ्या मोड्युलचा निकाल 21.28 टक्के इतका लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्या मोड्युलचा 8.27 टक्के, तर दुसऱ्या मोड्युलचा 15.29 टक्के निकाल लागला आहे.
प्रोफेशनल प्रोग्रॅमच्या जुन्य अभ्यासक्रमात पहिल्या मोड्युलचा 27.77 टक्के, तर दुसऱ्या मोड्युलचा 28.26 टक्के, तर तिसऱ्या मोड्युलमध्ये 33.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवीन अभ्यासक्रमात पहिले मोड्युलचा 19.39 टक्के, दुसरे मोड्युल 17.81 टक्के, तर तिसऱ्या मोड्युलचा निकाल 34.52 टक्के इतका लागला आहे. प्रोफेशनलमध्ये जुन्या अभ्यासक्रमात औरंगाबादचा सुदर्शन महर्षी, तर नवीन अभ्यासक्रमात गुजरातची तनया ग्रोव्हर यांनी देशात प्रथम क्रमांक पटकाविला.
दरम्यान, यापुढची प्रोफेशनल व एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅमची परीक्षा 1 ते 10 जूनदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत 25 मार्चपर्यंत आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियातर्फे देण्यात आली.