राहुरी – कौटुंबिक वादातून पत्नी व सासूची टणक हत्याराने डोक्यात वार करून खून करण्यात आला. त्यानंतर जावायाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पत्नी व सासूचा खून केल्यानंतर फरार झालेल्या सागर सुरेश साबळे यांना आत्महत्या केली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कात्रड येथे कौटुंबिक वादातून नूतन सागर साबळे (वय 23) व तिची आई सुरेखा दिलीप दांगट (वय 45) या दोघींचा खून झाला. सागर साबळे हा घरजावई आहे. काल त्यांच्या घरात आधिकमास निमित्ताने धोंडा होता. मात्र एमआयडीसी नगरमध्ये नोकरीला असलेल्या सागर साबळे यास कंपनीत कामासाठी जावे लागले. तो कार्यक्रमास हजर नव्हता. तो घरी केव्हा आला आणि पुढे काय घटना घडली हे प्रत्यक्षात सागर साबळे ताब्यात आल्यानंतरच स्पष्ट होणार होते. मात्र आता त्याचे प्रेतच आढळले आहे.
धोंड्याचा कार्यक्रम आटोपून मायलेकी घरात झोपलेल्या होत्या. कौटुंबिक वादातून नूतन साबळे हिचा पती सागर सुरेश साबळे याने त्या दोघी झोपेत असतानाच टणक हत्याराने प्रहार करून त्यांचा खून केला. त्यानंतर तो फरार झाला होता.जाताना त्याने त्याची छोटी मुलगी शेजारी भावाकडे नेऊन ठेवली.त्याचा भाऊ आणि आई एक किलोमीटर अंतरावर स्वतंत्रपणे रहातात. अचानक छोट्या मुलीला घरी आणून का सोडले हा प्रश्न सागर साबळे याचे भावाला व आईला पडला. रात्री अकराचे सुमारास सागरचा भाऊ सागरच्या छोट्या मुलीला तिच्या आईकडे सोपविण्यासाठी म्हणून आला. तेव्हा त्याला या दोघी मायलेकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्याने तत्काळ आरडाओरडा केला. राहुरी पोलिसांना तत्काळ फोन केला. पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव लोखंडे, उपनिरीक्षक सुरेश खोंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
सागर साबळे पसार असल्याने त्याच्यावर संशयाची सुई सरकली होती. त्याच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली होती. कात्रड येथे घडलेल्या दूहेरी खून प्रकरणी घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट देवून तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
कारण गुलदस्त्यातच
कात्रड येथील खून प्रकरणातील संशयित आरोपीने आत्महत्या केल्याने दुहेरी हत्याकांडातील कारण गुलदस्त्यातच राहण्याची शक्यता आहे. कात्रड येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपी सागर साबळे याचे प्रेत धनगरवाडी शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. सागर साबळे याने धनगरवाडी शिवारात शिकारे यांचे शेतातील चिंचेचे झाडाला गळफास घेतला. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.