सर्वोच्च न्यायालयाकडून आरोपीची फेरविचार याचिका फेटाळली
नवी दिल्ली : कोईम्बतूर इथे 2010 साली 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि या मुलीसह तिच्या भावाच्या हत्या प्रकरणी आरोपींना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची सर्वोच्च न्यायालयाने पुष्टी केली आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी मनोहरन याने दाखल केलेली फेरविचाराचीा याचिका न्या. आर.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने फेटाळून लावली. निकालाचा फेरविचार करण्याचा कोणताही मुद्दाच नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
तीन सदस्यीय या पिठाचे सदस्य असलेल्या न्या. संजीव् खन्ना यांनी मात्र फाशीच्या शिक्षेबाबत विरुद्ध मत नोंदवले. तीनपैकी दोन न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा योग्यच असल्याचे मत बहुमताने नोंदवल्याने दोषी आरोपीची याचिका फेटाळण्यात आली.
मनोहरन याने अन्य सहआरोपी मोहनकृष्णन यांनी मिळून 29 ऑक्टोबर 2010 रोजी 10 वर्षांची मुलगी आणि तिचा 7 वर्षांच्या भावाचे अपहरण केले होते. त्यानंतर या दोघांनी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर या मुलीसह तिच्या 7 वर्षांच्या भावाला हात बांधून कालव्यात फेकून त्यांची हत्या केली होती. हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मनोहरन याला 1 ऑगस्ट रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. मनोहरनचा साथीदार मोहनकृष्णन हा नंतरएका चकमकीमध्ये मारला गेला होता.