औंध, दि. 11 – पाषाण परिसरामध्ये जोरदार पावसामुळे विठ्ठलनगर-लोंढे वस्तीत घरांमध्ये पाणी शिरले. तसेच सुस रोड येथे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय झाली. तर वाहने रस्त्यातच बंद पडलेली दिसून आले. पंचवटी येथे झाड पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. तर लमाणतांडा येथे घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.
राम नदीकिनारी असलेले सोमेश्वर वाडी येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरातील पिंड पाण्याखाली गेली. बाणेर प्रमुख रस्ता पाणी झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याला नदीच्या स्वरूप आले होते. बाटा शोरूमसमोर, भैरवी हॉटेलच्या समोरील रस्ता, सोमेश्वर वाडी चौक येथे पाणी साठल्याचे या वेळी दिसून आले.
बाणेर परिसरात स्मार्ट सिटीची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. यामुळे बाणेर परिसरात सर्वत्र पाणी साठले होते. पावसाळी जलवाहिनीची झाकणे लहान आकाराची केल्यामुळे निचरा संथ गतीने होत होता. तसेच बाणेर येथे मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण बाणेर रोड आज पाण्याखाली गेला होता.
– अनिकेत मुरकुटे, मनसे