– आशिष निनगुरकर
कोजागरी आणि चंद्राचे एक वेगळे नाते आहे. कोजागरी पौर्णिमेनिमित्त चंद्र चांदण्यांवर लिहिलेल्या मराठी व हिंदी चित्रपटांतील श्रवणीय सदाबहार गाण्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब असणाऱ्या चित्रपटसृष्टीने चंद्राची ओळख प्रेमाचे प्रतीक म्हणून बऱ्याच दशकांपूर्वी करून दिली आहे. आपल्या प्रेमिकेसाठी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणणाऱ्या प्रियकराची प्रतिमा निर्माण करण्याचे श्रेय बॉलीवूडलाच जाते. हिंदी चित्रपटाच्या नायकाला आपल्या नायिकेच्या चेहऱ्यात चंद्र दिसला, तर कधी चंद्राची चमक प्रेयसीच्या चेहऱ्यापुढे फिकी पडली आहे. अभिनेते-दिग्दर्शक गुरूदत्त आणि वहिदा रेहमान या आयकॉनिक जोडीचा चित्रपट “चौदहवीं का चांद’ या चित्रपटातील “चौदहवीं का चांद हो, या आफताब हो…’ हे गीत आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर असेल. मोहम्मद रफी यांनी हे गाणं गायलं आहे. जे आजही लोक गुणगुणत असतात.
“काला बाजार’ चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या आवाजातील “खोया खोया चांद, खुला आसमां’ हे गाणं आणि अभिनेता देव आनंदची अदाकारी म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानीच! हे गाणं ऐकलं की एक वेगळंच समाधान मनाला मिळतं. देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही चर्चेत आहे.
“पडोसन’मधील सुनील दत्त, किशोर कुमार, महमूद आणि सायराबानू यांच्यावर चित्रीत “मेरे सामनेवाली खिडकी में एक चांद का टुकडा’ हे गाणं बघणं आणि ऐकणं म्हणजे सुखद अनुभव… निव्वळ आनंद! हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं आहे. या गाण्यात प्रेयसीला चंद्राची उपमा देण्यात आली आहे. “कश्मीर की कली’ या चित्रपटातील “ये चांदसा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनहरा’ हे गाणे शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रीत आहे. आजही हे गाणं लोकांच्या मनात रुंजी घालतं.
70च्या दशकातील “हम किसीसे कम नहीं’ चित्रपटातील “चांद मेरा दिल, चांदनी हो तुम’ या गाण्यात देखील नायकाने स्वतःच्या हृदयाला चंद्राची आणि नायिकेला चांदणीची उपमा दिली. हे गाणंही त्या काळात खूप गाजलं होतं. इतकंच नव्हे तर हे गाणं अभिनेता शाहरुख खान याच्या 2004 साली प्रदर्शित झालेल्या “मैं हूं ना’ या चित्रपटातील त्याच्या आणि अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्या रोमॅंटिक दृश्यासाठी देखील वापरलं गेलं.
“जख्म’ चित्रपटात नागार्जुन आणि पूजा भट्ट यांच्यावर चित्रीत आणि अलका याज्ञिकने स्वरबद्ध केलेले “गली में आज चांद निकला’ हे गीत! प्रेमातील दु:ख व्यक्त करतानाही बॉलीवूडने चंद्राचा आधार घेतला, हे विशेष! ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या “हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात प्रेमाचा साक्षीदार ठरला तो चंद्रच! या गाजलेल्या चित्रपटातील “चांद छुपा बादल में’ हे गाणं म्हणजे गायक, गीतकार, संगीतकार, अभिनय अशा सगळ्यांची जमून आलेली फर्मास केमिस्ट्री! “येस बॉस’ चित्रपटातील स्वप्नाळू नायकाने घातलेली प्रेमळ गळ म्हणजे “चांद तारे तोड लाऊं’ हे गीत, चंद्राशी आपलं नातं आणखी घट्ट करणारं!
“सपने’ या सिनेमातलं “चंदा रे चंदा रे कभी तो जमींपर आ बैठेंगे बाते करेंगे’ हे गाणंही त्याच्या खास म्युझिकमुळे लोकांच्या स्मरणात आहे. ए. आर. रहमानचं संगीत, काजोल आणि प्रभू देवा यांचा डान्स आणि बेधुंद करणारी रात्र हे पाहून मन मोहून जातं.
“अब्दुल्ला’ सिनेमातील “मैने पूछा चांद से’ या गाण्यात नायकाने आपल्या प्रेयसीप्रती प्रेम व्यक्त करताना तिला उद्देशून “चंद्रानेसुद्धा तुझ्याइतकी सुंदर तरुणी कधी पाहिली नसावी’ असं म्हटलं आहे. “फना’ चित्रपटातील “चांद सिफारीश’ हे गाणे देखील प्रचंड लोकप्रिय आहे. या गाण्यात काजोल आणि आमिर खानचा खास अंदाज पाहायला मिळतो.
हिंदी सिनेमांप्रमाणेच मराठी सिनेमांमध्येही चंद्राची उपमा देऊन गाणी लिहिण्यात आली आहेत. “उंबरठा’ सिनेमातलं “चांद मातला’ हे गाणं आजही आपल्या तोंडी अगदी सहजपणे येतं. त्याचप्रमाणे “तोच चंद्रमा नभात’, “हा चंद्र जिवाला लावी पिसे’, “चांदोबा चांदोबा भागलास का?’ ही गाणीही चर्चेत आहेत. “उगवला चंद्र पुनवेचा! मम हृदयी दरिया! उसळला प्रीतीचा!’ हे “पाणीग्रहण’ नाटकातील बकुळ पंडित यांनी गायलेलं नाट्यगीत. प्र. के. अत्रे यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. “हे सुरांनो चंद्र व्हा’ या गाण्यात चांदण्यांचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा. “ययाती देवयानी’ या चित्रपटासाठी कुसुमाग्रजांनी लिहिलेले आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील हे गाणं. पुनवेचा चंद्र आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी, चांदण्याच्या चुऱ्यात, खाऱ्याखाऱ्या वाऱ्यात, तुझा माझा एकान्त रे, साजना! 1968 मध्ये “मंगळसूत्र’ या सिनेमासाठी शांता शेळके यांनी लिहिलेले आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरातील हे गाणं. “पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला! आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबूडकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे श्रवणीय गीत.
“शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी
डोळे पहा
तू अशी, जवळी रहा’
यमनकल्याण रागातलं अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरातील “शुक्रतारा’ हे गाणं. मंगेश पाडगावकरांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. या गाण्याला 50हून अधिक वर्षे झाली आहेत, तरी आजही तरुण पिढीत हे गाणं तितकेच लोकप्रिय आहे.
नव्याने सुपरहिट असलेले “ये तेरी चांद बालियां’ आणि “तेरे वास्ते फलक से मैं चांद लाऊंगा’ ही गाणी, नव्या पिढीलाही चंद्राविषयी असलेले आकर्षण दाखवतात. यातील प्रत्येक गाणं कमालीचं सुश्राव्य आहे. आणखीही अशी बरीच गाणी आहेत. वरील गाण्यांवरून आपल्या लक्षात येतं की, बॉलीवूड विश्वात चंद्राला किती महत्त्व आहे. आपली सिनेसृष्टी आणि चंद्र यांचं अत्यंत गहिरं नातं आहे. चंद्रावर लिहिलेली गाणी ही आजही लोकांच्या मनात रुंजी घालत आहेत.