जेरूसलेम: इस्राईलमधील चीनचे राजदूत आज आपल्याच निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. तेल अविवच्या उत्तरेकडील भागातल्या निवासस्थानी ड्यू वेई यांचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. इस्राईलच्या विदेश मंत्रालयाच्या वतीने ही महिती देण्यात आली. या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेमागील कारणाचा तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
ड्यू वेई यांना या वर्षी फेब्रुवारीमध्ये चीनकडून इस्राईलमध्ये राजदूत म्हणून नियुक्त केले गेले. त्यावेळी चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाचा कहर सुरू होता. वेई हे यापूर्वी युक्रेनमधील चीनचे दूत म्हणून नियुक्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. दोघेही इस्त्राईलमध्ये नव्हते.
इस्रायलचे चीनशी चांगले संबंध आहेत. इस्रायलमधील चिनी गुंतवणुकीचा निषेध करणारे आणि चीनने करोनाच्या प्रादुर्भावाविषयी माहिती लपविल्याचा आरोप करणारे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांची भेट वेई यांनी घेतली होती. मात्र, त्याच्या दोनच दिवसांनी त्यांचा गूढरितीने मृत्यू झाला आहे.