पुसेसावळी – चोराडे (ता.खटाव) येथून बाईकवरून देशभ्रमंतीला निघालेल्या कुमार पिसाळ या दिव्यांग बाईक रायडर तरुणाची द्रास (कारगील) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. त्याच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्याला पुढील प्रवासासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
कुमार हा दिव्यांग असूनही दिव्यांग सशक्तीकरण आणि हेल्मेट वापरून सुरक्षित रस्ते प्रवासासाठी जनजागृती करण्यासाठी त्याचा हा प्रवास सुरु आहे. तब्बल 16 दिवसांच्या प्रवासानंतर द्रासला पोहोचल्यावर त्याची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीर दौऱ्यावर होते.
त्यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास युद्ध स्मारकाला भेट देऊन ऑपरेशन “विजय’ मधील हुतात्म्यांच्या स्मृतीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी मेजर जनरल सचिन मलिक, कारगिलचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत सुसे, कारगिलचे पोलीस अधीक्षक विनायत अली, “सरहद’ चे संस्थापक संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, लेफ्टनंट कर्नल संदीपसिंग दुल्लत, मॅरेथॉनचे संचालक वसंत गोखले, तांत्रिक संचालक सुमित वायकर, फिजिओथेरपिस्ट अली इराणी आदी मान्यवर उपस्थित होते.