पुणे – आपल्या पाल्याला थोडेसे खेळले तरी दम लागतोय, सारखी भोवळ येते, वारंवार अचानक हृदयाचे ठोके वाढत असतील तर पालकांनी तत्काळ बालरोगतज्ज्ञ किंवा हृदयरोग तज्ज्ञांची भेट घेऊन आवश्यक ती तपासणी करून घ्यावी.ही लक्षणे मुलांसाठी कधीही जीवघेणी ठरू शकतात.
वानवडी परिसरात 14 वर्षीय मुलाचे हृदय बंद पडले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. शवविच्छेदनात मुलाचा मृत्यू “हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी’ या आजारामुळे झाल्याचा अहवालातून समोर आले.
दरम्यान, याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर लाड यांच्याशी चर्चा केली असता, “हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी’ हा एक आजार असून, त्याची वेळीच लक्षणे ओळखून उपचार केले तर भविष्यात धोका टाळू शकतो. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या हालचालींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडिया हाताळताना विविध व्हिडिओत विविध मैदानी खेळ खेळताना अचानक कोसळल्याचे दिसून येते. हे सर्व प्रकार या हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी’ या आजारामुळे होत असतात, असे आता बोलले जाते आहे. त्याचबरोबर हृदयासंबंधी विविध समस्या, लक्षणे दिसूनही मुले घरी सांगत नाहीत. किंवा खेळण्याच्या नादात दुर्लक्ष करतात. पण, हे टाळण्यासाठी पालकांनीही मुलांना आरोग्याच्याबाबतीत जागरूक करणे आवश्यक आहे.
काही आजारांमध्ये बाहेरून काहीही कळत नाही. मुले नॉर्मल वाटतात. मात्र, त्यांच्या हालचाली आणि आरोग्यबाबतच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे. या आजारात ज्याप्रमाणे हाता-पायाचे स्नायू लुज असताज, त्याचप्रमाणे हृदयाचे मसल्सही लुज असतात, त्यामुळे पंपिंग कमी होते. त्यामुळे तपासणीतून या सर्व बाबी समोर येतात आणि पुढील धोका टळू शकतो.
– डॉ. सागर लाड, बालरोगतज्ज्ञ
दुर्लक्ष नकोच…
मुलाला फुफ्फुसाचा आजार नसेल आणि त्याला शाळेत कवायती करताना किंवा मैदानावर खेळताना जास्त दम लागत असेल, मुलाची वाढ कमी होते. भोवळ येऊन चक्कर येते, अचानक हृदयाचे ठोके वाढतात, ही लक्षणे वारंवार दिसत असतील तर पालकांनी तत्काळ बालरोगतज्ज्ञ किंवा हृदयरोग तज्ज्ञांची भेट घेऊन मुलाची इको आणि एक्स-रे किंवा अन्य तपासण्या करून उपचार घ्यावेत.