Entertainment : ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील अमिर खान, आर.माधवन आणि शरमन जोशी यांची भूमिका सर्वांच्या पसंतीस पडली होती. याशिवाय या चित्रपटात चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या चित्रपटातील त्याच्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या चित्रपटातनंतर आता ओमी एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.
ओमीची प्रमुख भूमिका असलेला ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा नायक समर अर्थात ओमी वैद्य अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा, धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक “मराठीपण” जोपासू शकतील काय? हाच त्याचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ‘मी येतीये १९ जानेवारीला सिनेमास्पृहात, oh sorry गृहात! तुम्ही येतीये ना?’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असल्याने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात ओमी वैद्य व्यतिरिक्त संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर हे कलाकार दिसणार आहेत. येत्या 19 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.