नवी दिल्ली – “चांद्रयान-3’च्या विक्रम लॅंडरवर बसवण्यात आलेल्या “चॅत्स्टे’ (चंद्राचा पृष्ठभाग थर्मोफिजिकल प्रयोग) पेलोडने चंद्राच्या तापमानाशी संबंधित पहिले निरीक्षण पाठवले आहे. चॅत्स्टेनुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर आणि वेगवेगळ्या खोलीच्या तापमानात खूप फरक आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावरील तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस आहे. तर, 80 मिमी खोलीवर उणे 10 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. “चॅत्स्टे’ मध्ये 10 तापमान सेन्सर आहेत, जे 10 सेमी म्हणजेच 100 मिमी खोलीपर्यंत पोहोचू शकतात.
“चॅत्स्टे’ पेलोड हे स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीने(व्हीएसएससी) फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. “आम्ही चंद्राचा दक्षिण ध्रुव निवडला कारण तिथे भविष्यात मानव वसवण्याची क्षमता असू शकते.
दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश अल्पकाळ टिकतो. आता चांद्रयान-3 तेथील तापमान आणि इतर गोष्टींबाबत स्पष्ट माहिती पाठवत असल्याने, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या मातीत प्रत्यक्षात किती क्षमता आहे हे जाणून घेण्याचा शास्त्रज्ञ आता प्रयत्न करतील,’ असे इस्रोप्रमुख एस. सोमनाथ यांनी यापूर्वी म्हटले होते.