शिक्रापूर- उच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतींवर बंदी असताना देखील न्यायालयाचे आदेश झुगारून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून बैलगाडे पळविल्याप्रकरणी कान्हूरमेसाई (ता. शिरूर) येथील 20 जणांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
संजय फक्कडराव शिंदे, सुधीर नानाभाऊ पुंडे, बंडू निवृत्ती ननावरे, चंद्रकांत सर्जेराव दळवी, कैलास सुभान ननावरे यांच्याह 15 ते 20 जण (सर्व रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर) यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. तर पोलीस कॉन्सटेबल भास्कर महादेव बुधवंत (रा. शिक्रापूर ता. शिरूर) फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, कान्हूर मेसाई गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून त्या ठिकाणी बैलगाडे पळविले जात असल्याची शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस कॉन्सटेबल भास्कर बुधवंत हे कान्हूर मेसाई गावामध्ये गेले असताना त्यांना तेथील बैलगाडा घाटामध्ये बैलगाडे जुंपून बैलांना पळविले जात असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलीस आल्याची चाहूल लागताच तेथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारे तसेच बैलगाडे पळविणारे व्यक्ती पळून गेले. यावेळी पोलिसांनी माहिती घेतली असताना संजय फक्कडराव शिंदे यांसह गावातील काही ग्रामस्थांनी एकत्र येत बैलगाडा शर्यत समिती स्थापन करून त्यानुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून बैलगाडे पळविले असल्याचे समजले त्यावरून वरील 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर व पोलीस नाईक तेजस रासकर हे करत आहे.
- यापूर्वी अनेकदा गाडे पळवून पोलीस गप्प का ?
शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये यापूर्वी काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, तर काही ठिकाणी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मोठ्या स्पीकरच्या आवाजामध्ये बैलगाडे पळविले गेले तरी देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही मग यापूर्वी अनेकदा काही ठिकाणी बैलगाडे पळविले गेले तेव्हा पोलीस गप्प का असा सवाल बैलगाडा प्रेमींना पडला आहे.
मग यापूर्वी अनेकदा काही ठिकाणी बैलगाडे पळविले गेले तेव्हा पोलीस गप्प का असा सवाल पडला आहे.
नाद एकच बैलगाडा शर्यत??