Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून बसचालक बचवला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यानंतर या बसचालकाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे फॉरेन्सिक अहवालातून समोर आले आहे. बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे अहवालातून उघड झाले आहे.
रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. यामुळे समृद्धी महामार्गामुळे झालेला हा अपघात चालकाने मद्यपान केल्यामुळे घडल्याची शंका उपस्थित केली जात आहे. याआधी टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे अंदाज लावण्यात आला होता. त्यानुसार टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले. मात्र ही शक्यता फेटाळण्यात आली.
बसचालकाला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा?
अपघातावेळी ड्रायव्हर झोपला होता आणि त्यामुळे बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला. आयपीसी कलम 304 अन्वये बसचालकावर दोषी हत्येसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रायव्हर दानिशच्या रक्त अहवालामुळे त्याला दोषी ठरवलं जाऊ शकतं, परिणामी त्याला 10 वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
कसा घडला अपघात ?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यादरम्यान हा अपघात घडला. सुरूवातीला बसचा टायर फुटला त्यानंतर ती दुभाजकाला जाऊन धडकली, पलटी झाली आणि त्यानंतर बसने पेट घेतला अशी माहिती मिळाली होती.