नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे सत्र 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच भाषण असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे.
यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. विद्यमान सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प ठरणार आहे.
अधिवेशनाच्या सर्व 66 दिवसांत सर्वसाधारण सुट्टीसह 27 बैठका चालणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. अमृत काल दरम्यान राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि इतर बाबींवर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उत्सुक आहोत. वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, 14 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत सुट्टी असेल, जेणेकरून विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागण्यांचे परीक्षण करू शकतील आणि त्यांच्या मंत्रालये आणि विभागांशी संबंधित अहवाल तयार करू शकतील.
पुढील वर्षी साधारणपणे एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणुका असल्याने, त्यावेळी सरकारला लेखानुदान मंजूर करुन घ्यावे लागेल. त्या अर्थाने विद्यमान सरकारसाठी हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.