Body Dumped : माणुसकीला काळिमा! अपघातातील जखमीला रुग्णालयात नेण्याऐवजी चालकाने मृतदेह रस्त्यावर फेकला
Body Dumped : अपघात लपवण्यासाठी जखमीलाच वाहनात टाकून चालक फरार; उपचाराअभावी मृत्यू झाल्यावर मृतदेह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकला.

Body Dumped – खालुम्ब्रे येथे गुरूवारी (दि. ४) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात न नेत त्याचा मृतदेह दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून पुरावा नष्ट करण्यात आला. दरम्यान पिकअप चालकाला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहबूब लकीब मोहम्मद शेख (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मनोज विश्वकर्मा (वय ३५) यांचा या अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे १० वाजता खालुम्ब्रे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर मनोजकुमार विश्वकर्मा हे रस्ता ओलांडत असताना भरधाव पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघातानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मनोजकुमार यांना मदत करण्याऐवजी आरोपीने त्यांना आपल्या वाहनात टाकून घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी असलेल्या मनोज कुमार यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असतानाही आरोपीने त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल केले नाही. उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून दिल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान अपघातातील पिकअप (एमएच-१२-झेडई-०७७९) असल्याचे निष्पन्न झाले. जखमी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही आरोपीने उपचारासाठी कोणतीही मदत न केल्याने त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे वाढीव कलम लावण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई परिमंडळ-४च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला करीत आहेत.




