Pune Crime: वाघोलीत पोलिसांचा मोठा छापा! नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या १०० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त
Pune Crime: नशेसाठी बेकायदेशीरपणे मॅफेन्टरमाईन सल्फेटचा साठा बाळगणाऱ्या दोघांवर वाघोली पोलिसांची कारवाई; दुचाकीसह २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

Pune Crime – नशेसाठी मॅफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्यांचा साठा बाळगणाऱ्या दोघांच्या विरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सूरज पद्माकर भुत्ते (१८,रा. जगताप वस्ती वाघोली, मूळ कंधार, जि. नांदेड), आकाश गणेश धनवटे (१९, रा. लोणीकंद) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे. दोघांच्या ताब्यातून तब्बल शंभर बाटल्या जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी, पोलिस कर्मचारी अशोक अप्पासाहेब शेळके यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या दोघांच्या विरुद्ध औषधद्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ सातच्या हद्दीत पोलिसांकडून सध्या मिशन क्रॅकडाऊन सुरू आहे. त्यानुसार वाघोली पोलिसांचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी बुधवारी (दि. २२) रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास पथकाला माहिती मिळाली की,
काही व्यक्ती बेकायदेशीरपणे नशेसाठी मॅफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शनचासाठा आपल्या ताब्यात बाळगून आहेत. त्यानुसार पहाटे सुमारे आय.व्ही. इस्टेट रोडवरील ऑर्चिड साई प्रॉपर्टीज परिसरात सापळा रचला. दोघा संशियितांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून ३० मिली क्षमतेच्या इंजेक्शनच्या १०० बाटल्या तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही इंजेक्शने ऑनलाइन मागविल्याची माहिती समोर आली आहे. या इंजेक्शनचा पुरवठा करणारे कोण, त्यामागे आणखी कोणाचे रॅकेट कार्यरत आहे आणि ही इंजेक्शने कोणाला विकली जात होती, याचा वाघोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.





