Student Suicide: नीट परीक्षेच्या निकालानंतर धक्कादायक घटना; मोहम्मदवाडीत १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
Student Suicide: नीटचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी सॅफ्रॉन हिल सोसायटीमध्ये घडली दुर्दैवी घटना; एकुलती एक मुलगी गमावल्याने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर.

Student Suicide – राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेच्या निकालानंतर एका विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. अनुष्का चौगुले (१८,रा.सॅफ्रॉन हिल सोसायटी, मंहंमदवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. नीट परीक्षेचा गुरुवारी निकाल लागल्यानंतर शुक्रवारी (दि.१७) सकाळी साडे नऊ वाजताच्या ही घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी, काळेपडळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर म्हणाल्या की, अनुष्काने नीटची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला. वडील खासगी नोकरी करतात तर आई गृहीणी आहे. अनुष्काला एक लहान भाऊ आहे. सकाळी वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते, तर भाऊ शाळेत गेला होता. आई आणि ती असे दोघे घरी होते.
काल नीटच्या निकालाचे संकेतस्थळ डाऊन होते. त्यामुळे तिने आज सकाळी निकाल पाहिला असावा. अनुष्का त्यानंतर तिच्या खोलीत गेली. उशीरापर्यंत आवाज देऊनही ती दरवाजा उघडत नाही, हे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने दुसऱ्या किल्लीच्या मदतीने खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी अनुष्काने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी खोलीत पाहिले असता, सुसाईड नोट मिळून आली नाही. तसेच ती मोबाइल वापरत नव्हती. त्यामुळे अनुष्का हिने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकलेले नाही. पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत. नीट परीक्षा दिलेला एक १७ वर्षीय विद्यार्थी सहकारनगर येथे जिन्यावरुन पडून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ रूग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करत आहेत.





