Pune crime : पुण्यातील बिल्डरची आत्महत्या; सुसाईड नोटतून धक्कादायक आरोप
गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या एका बिल्डरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी संबंधित बिल्डरने सविस्तर सुसाईड नोटही लिहून ठेवल्याची माहिती आहे.

Pune crime : गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या एका बिल्डरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी संबंधित बिल्डरने सविस्तर सुसाईड नोटही लिहून ठेवल्याची माहिती आहे.
ही सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, त्यामध्ये शहरातील काही नामांकित राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक आणि इतर व्यक्तींवर आर्थिक फसवणूक, पैसे अडकवणे, व्याजाच्या व्यवहारातून छळ करणे आणि देणी न फेडल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सुसाईड नोटमध्ये कसबा पेठेतील एका पुनर्विकास प्रकल्पातील भागीदारी, फ्लॅट विक्री, भाड्याचे उत्पन्न, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांतील वाद तसेच विविध बांधकाम कंपन्यांकडील थकीत देयकांचा उल्लेख करण्यात आला आहे. काही व्यक्तींनी मोठी रक्कम घेतल्यानंतर ती परत न केल्याने आर्थिक संकटात सापडलो आणि त्यातूनच आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा दावा मृताने केला आहे.
तसेच, काही राजकीय पदाधिकाऱ्यांची व व्यावसायिकांची नावेही सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सुसाईड नोट, व्हिडिओ आणि संबंधित आर्थिक कागदपत्रे ताब्यात घेतली असून, त्यांची पडताळणी सुरू आहे.
या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून, संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे.





