वॉशिंग्टन,/ ढाका – अमेरिकेतील ब्लॉग लेखक अवजीत रॉय यांच्या मारेकऱ्यांबद्दल माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून तब्बल 5 दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती आज दिली.
ढाक्यामध्ये 2015 साली इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अवजीत रॉय हे ठार झाले होते. तर त्यांच्या पत्नी रफिदा बोनया अहमद या गंभीर जखमी झाल्या होत्या. मूळ बांगलादेशी वंशाचे असलेले 42 वर्षीय रॉय हे अमेरिकेचे नागरिक होते. ढाका विद्यापिठामध्ये 26 फेब्रुवारी 2015 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनातून बाहेर पडल्यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अवजीत यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या,.
अवजीत रॉय हे आपल्या लेखनातून धार्मिक स्वातंत्र्याबद्दल आपली परखड मते मांडत असत. धर्मिक मूलतत्ववादावर ते कडाडून टीका करत असत. त्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल ठोस माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून 5 दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांवर आरोपपत्र ठेवून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या हत्येच्या कारस्थानात दोषी ठरलेल्या दोघांवर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवला गेला आणि ते अजूनही फरार आहेत.