कोल्हापूर – धनंजय महाडिक यांच्या रूपाने कोल्हापुरात कमळ फुलले आहे. पण ते राज्यसभेत. यामुळे आता कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात भाजपचा खासदार निवडून देण्यासाठी सध्या भारतीय जनता पार्टी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही.
ती संख्या वाढविण्यासाठीही फिल्डींग लावण्यात येत आहे. आणि याच दृष्टीने पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा आजचा दौरा पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून, या दौऱ्यासाठी कोल्हापुरात जोरदार तयारी करण्यात आली आहे.
यावेळी अमित शाह दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या शेजारी विशेष स्टेज उभारलं आहे. अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष स्टेज उभारलं आहे.
तसेच येवले नागाळा पार्कातील मैदानावर अमित शहांची जाहीर सभा देखील होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. सध्या कोल्हापुरात जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु असल्याचं यातून दिसून येत आहे.