India Politics : येत्या काही महिन्यांत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. तर 2024मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीए, इंडिया आघाडी, विशेषत: भाजप आणि काॅंग्रेसकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. यात कोणतीही कसर सोडली जात नसल्याचे दिसत आहे.
याच दरम्यान, भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर (एक्स) हॅंडलवर काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांचा सात डोके असलेला फोटो शेअर करत ‘नवीन युगाचा रावण’ असा उल्लेख केला आहे.
The new age Ravan is here. He is Evil. Anti Dharma. Anti Ram. His aim is to destroy Bharat. pic.twitter.com/AwDKxJpDHB
— BJP (@BJP4India) October 5, 2023
“नवीन युगाचा रावण आला आहे. तो दुष्ट आहे. धर्मविरोधी. राम विरोधी. भारताचा नाश करणे हे त्यांचे ध्येय आहे.”, असे ट्विटमध्ये लिहिले आहे.
राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भाजपने फोटोशॉप केलेल्या छायाचित्राचा वापर केला असून, त्यात राहुल गांधी यांची सात शीर दाखवण्यात आली आहेत. त्यांच्या कपड्यांवरही योद्ध्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपचा धारदार हल्ला नव्या राजकीय आखाड्याचा आधार बनू शकतो. काँग्रेसही या पोस्टरला आक्षेपार्ह म्हणत त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न करू शकते.
रावण – जॉर्ज सोरोस दिग्दर्शित काँग्रेस पक्षाची निर्मिती (RAVAN a congress party production directed by george soros)
भाजपने फोटो शेअर करून त्यावर रावण असे लिहिले आहे. तसेच ‘जाॅर्ज सोरोस दिग्दर्शित काॅंग्रेस पक्षाची निर्मिती’ असेही लिहिण्यात आले आहे. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या खासदारावर निशाणा साधत भाजपने जॉर्ज सोरोस यांना संचालक म्हणून संबोधले. जॉर्ज सोरोस यांच्यावर भारतविरोधी कंटेंटसाठी निधी पुरवल्याचा गंभीर आरोप आहे.