गोध्रा – गुजरातमध्ये 2002 साली गोध्रा जळीतकांड झाल्याने गोध्रा शहर चर्चेत आले होते. आता गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमने अपक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. गोध्रा नगरपरिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी ट्विट केले आहे.
पठाण यांनी गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणे हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. वारिस पठाण यांनी भाजपकडून सत्ता खेचून आणल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. एमआयएमने गुजरातमध्ये गोध्रात सत्ता स्थापन करुन यशस्वी सुरुवात केली असल्याचा दावाही पठाण यांनी केला आहे. गुजरातमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामध्ये एमआयएमने चांगले यश मिळवले होते. गोध्रा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला 18 , कॉंग्रेसला 1, एमआयएमला 7 आणि अपक्षांना 18 जागांवर विजय मिळाला होता. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी गोध्रामध्ये प्रचार देखील केला होता.