नगर – संगमनेर येथे निघालेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या हिंदू नागरिकांना कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी दंगलखोर संबोधून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून सकल हिंदू समाजाचा अपमान केला. त्याच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा नेण्यात आला.
संगमनेर शहरामध्ये सकल हिंदु समाजाच्या वतीने 6 जून रोजी लव्ह जिहाद, धर्मांतर आणि एका समाजाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये झालेली वाढ याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्याबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाचा अपमान केला. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर भाजपच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढून जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवेंद्र गांधी, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, ओबीसी मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सरचिटणीस तुषार पोटे, संतोष गांधी, सचिन पारखी, शशांक कुलकर्णी, वसंत राठोड, बाळासाहेब भुजबळ, किशोर वाकळे, अमोल निस्ताने, पुष्कर कुलकर्णी, महिला आघाडीच्या प्रिया जानव्हे, संगीता खरमाळे, ज्योती दांगडे, रेखा विधाते, रेणुका करंदीकर, सचिन पावले, निलेश जाधव, शिवा आढाव, रोहन शेलार, राहुल जामगावकर, राहुल बुधवंत आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
विखे समर्थकांची पाठ
भाजपकडून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या मोर्चाकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ.सुजय विखे यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. केवळ निधीसाठी पुढे असलेले विखे समर्थक मोर्चात का सहभागी झाले नाही असा सवाल निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.