कोट्टयम – कॅथोलिक नन्सवर बलात्कार केल्याच्या देशभर खळबळ उडवणाऱ्या आरोपातून बिशप फ्रान्को मुलक्कल यांची कोट्टयम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मुक्तता केली. मुलक्कल हे जालंधर येथे बिशप होते. त्यांची बलात्काराचा आरोप झाल्यानंतर 2018 मध्ये प्रशासनाने हकालपट्टी केली होती.
न्यायालयातून बाहेर पडताना मुलक्कल यांनी “देवाचे स्तवन करा’ असा उपदेश पत्रकारांना उद्देशून केला. निकाल जाहीर होताच आपल्या भावनांवरील नियंत्रण गमावून न्यायालयातच त्यांनी आपल्या वकिलांना मिठी मारली.
कोट्टयम येथील संस्थेमध्ये असताना पाच मे 2014 पासून मुलक्कल यांनी तब्बल 13 वेळा बलात्कार केल्याचा आरोप नन्सने केला होता. त्यानंतर त्यांना सप्टेंबर 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. भारतात बलात्काराच्या आरोपाखाली अटक होणारे ते पहिलेच बिशप होते. त्यांना अटक केल्यानंतर त्यांना 25 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
हा अत्यंत दुर्देवी निर्णय आहे. आमच्यासाठी तो धक्कादायक आहे. ते पुर्ण दोषी ठरतील, अशी आमची अपेक्षा होती. आम्ही अपील करू. आमच्याकडे परिस्थितीजन्य पुरावे खूप होते. या खटल्यातील साक्षिदार सामान्य माणसे होती, असे या प्रकरणाचे तपासी अधिकारी आणि कोट्टयमचे माजी पोलीस अधिक्षक एस. हरीशंकर यांनी सांगितले.
या अत्यंत हाय प्रोफाईल खटल्याच्या निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने कोट्टयम अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारतात प्रथमच बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपावरून एका कॅथोलिक बिशपला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाला महत्व प्राप्त झाले होते.
या खटल्याची सुनावणी 2020 मध्ये सुरू झाली. आपल्यावरील आरोप खारीज करण्याच्या मागणीसाठी मुलक्कल यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र त्या न्यायालयांनी तसे करण्यास नकार दिला होता.
एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून या नन्सवर कारवाई केल्याने हे आरोपाचे कुंभाड रचण्यात आले आहे, असा दावा करत बिशप यांनी हे आरोप फेटाळले होते. बेकायदा डांबणे, सत्तेचा वापर करून लैंगिक छळ, अनैसर्गिक शरीर संबंध, महिलेचा विनयभंग आदी आरोप मुलक्कल यांच्यावर ठेवण्यात आले होते.