Billie Jean King Cup 2024 :- बिली जीन किंग करंडकाच्या आशिया ओशनिया गट-1 मध्ये भारताच्या ऋतुजा भोसलेने एकेरीत, प्रार्थना ठोंबरे आणि अंकिता रैना या जोडीने दुहेरीचा सामना जिंकत चायनीज तैपेईचा 2-1 असा पराभव केला.
तीन सामन्यांतील दोन विजय आणि एका पराभवासह भारत सध्या अ गटात तिसऱ्या स्थानावर आहे. चीन आणि दक्षिण कोरिया त्यांचे तिन्ही सामने जिंकून अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. भोसलेने हाओ चिंग चॅनचा सरळ सेटमध्ये 6-3, 6-2 असा पराभव केला तर दुसऱ्या एकेरीत रैनाला अन शुओ लियांगकडून 6-2, 4-6, 4-6 असा पराभव पत्करावा लागला.
निर्णायक दुहेरी सामन्यात, रैनासह ठोंबरेने हाओ चिंग चॅन आणि अन शुओ लियांग यांच्या जोडीवर 4-6, 6-1 (15-13) असा विजय नोंदवून भारतासाठी सामना जिंकला.
ATP Rankings : नोव्हाक जोकोविचने रॉजर फेडररचा आणखी एक विक्रम काढला मोडीत…
बुधवारी चीनने भारताचा 3-0 असा पराभव केला. पण स्पर्धेच्या साखळी टप्प्यात भारताने पॅसिफिक ओशनियाचा 3-0 असा पराभव केला होता. सहा संघांच्या आशिया ओशनिया गट अ मधील अव्वल दोन संघ प्लेऑफमध्ये खेळणार आहेत. आता भारताचा सामना शनिवारी कोरियाशी होणार आहे.