नारायणगाव, -बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच झाली पाहिजे यासाठी सर्वस्व पणाला लावणार, असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. वडगाव कांदळी (नारायणगाव, ता. जुन्नर) येथील औद्योगिक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बेनके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पापाशेठ खोत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2016 ला आंबेगव्हाण येथील जागेची बिबट सफारीसाठी पाहणी करण्यात आली; परंतु आंबेगव्हाणचा परिसर डोंगर उतारांचा असल्याने बिबट सफारीसाठी योग्य नसावा म्हणून पुढील कारवाई झाली नसावी असा अंदाज आहे. शिवाय तसा प्रस्तावही शासन दरबारी नसल्याने तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे जुन्नरची बिबट सफारी बारामतीला पळवली हे म्हणण्याला अर्थ नाही.
बिबट सफारी जुन्नरची ओळख असल्याने जुन्नरकरांच्या भावना त्यात गुंतलेल्या आहे. लोकप्रतिनिधी म्हणून बिबट सफारी जुन्नर तालुक्यात होणारच. व त्यासाठी पहिले प्राधान्य आंबेगव्हाणला देण्यात येईल; परंतु तिथे काही अडचण निर्माण झाल्यास पर्याय म्हणून आळे, राजुरी,
उंचखडक किंवा नारायणगडचा पायथा, खोडद, वडगाव, सुलतानपूर या ठिकाणांचा प्रस्ताव देण्यात येईल. राष्ट्रवादीतील नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील बिबट सफरीचे गाऱ्हाणे मांडल्यावर ते निश्चितपणे ऐकून घेतील व त्यावर मार्ग काढून जुन्नरमध्येच बिबट सफरीच्या प्रकल्पाला मान्यता देतील याची खात्री आहे.
…तर जनआंदोलन उभे करणार
पुढील आठवड्यात पर्यटन विभाग, वित्त विभाग, पत्रकार यांच्या प्रतिनिधींसह मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांची भेट घेऊन बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच निर्माण करण्यासाठी भेट घेणार आहोत. जर बिबट सफारीसाठी त्यांनी सहकार्य केले नाही तर मोठे जनआंदोलन उभे करू, त्यावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्या सोबत राहील, असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.