बेंगळुरू – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूवर मात केल्यावर कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक गौतम गंभीरने बेंगळुरूच्या चाहत्यांना तसेच काही खेळाडूंना शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात असून त्याचे व्हिडिओ रोकॉर्डिंगही सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे गंभीर अडचणीत येण्याची शक्यता असून बीसीसीआय यावर काय भूमिका घेते याकडे सध्या लक्ष लागले आहे.
कोलकाताकडून पराभव झाल्यावर बेंगळुरूचे चाहते नाराज झाले होते. मात्र, सामन्यात एक क्षण असा होता की, बेंगळुरूचा विजय दृष्टिपथात अशताना चाहत्यांनी कोलकाताच्या खेळाडूंबाबत अपशब्दही वापरल्याचे सांगितले जात आहे. त्यालाच उत्तर देताना गंभीरचा तोल ढळला व त्याने मैदानावर आक्रमकता दाखवत असलेल्या बेंगळुरूच्या विराट कोहलीसह चाहत्यांच्या दिशेने आक्षेपार्ह हातवारेही केले.
तसेत अपशब्दही उच्चारले, असा आता आरोप केला जात आहे. सामना संपल्यावर गंभीरने कोहलीची गळाभेट घेत असे काही घडलेच नसल्याचे दाखवले असले तरीही याबाबत आता बीसीसीआयची शिस्तपालन समिती व आयपीएल समिती काय भूमिका घेणार व गंभीरवर काही कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.