Lok Sabha Election 2024 NCP Second List : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीत दोन जागांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली जागा बीड आणि भिवंडीतून उमेदावर जाहीर करण्यात आले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे तर भिवंड लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. यापार्श्वभूमीवर त्यांनी अनेकदा शरद पवार यांची भेट घेतली. काल बुधवारी देखील त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत काही स्पष्टपणे सांगितले नव्हते. पण लवकर याबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल, असे सूचकपणे म्हटले होते. त्यामुळे ज्योती मेटेंची बीडमधून उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र आज जाहीर झालेल्या यादीत बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे बीडमधून ज्योती मेटे यांच्या उमेदवारीच्या चर्चांना आता पूर्ण विराम लागला आहे.
बजरंग सोनवणेंचा पंकजा मुंडे यांच्याशी थेट सामना –
बीडमधून भाजपने विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या त्याऐवजी त्यांच्या भगिणी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी आता बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा थेट सामना पहायला मिळणार आहे.
पहिल्या यादीत 5 जणांची नावे –
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिल्या यादीत वर्धामधून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमधून भास्कर भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया –
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची यादी X या हॅंडलवर जाहीर केली आहे. यादी जाहीर करताना सोबत लिहिले आहे की, “विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया.”
विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया.… pic.twitter.com/yMi96DJqSp
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 4, 2024