Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहादूर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये विकी व्यस्त आहे. यानंतर अभिनेता शाहरुख खानसोबत ‘डंकी’ चित्रपटात विकी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत आता विकीने किंग खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच विकिने शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडचा बादशाह का म्हणतात? याबाबत देखील सांगितले आहे.
विकी कौशलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. यावेळी त्याने शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे असल्याचे म्हंटले आहे. सध्या डंकी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. यातच विकिने शाहरूख खानबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. मुलाखतीत विकी म्हणतो की, “शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव हा वेगळाच होता. त्याच्या सोबत स्क्रिन शेअर करणं हे खूप काही शिकवून जाणारे आहे. ते एका स्वप्नासारखे होते. किंग खानसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.”
पुढे तो म्हणाला की, “मला चित्रपटांविषयी आणखी जास्त सांगता येणार नाही. पण एकुण ती प्रोसेसच खूप भन्नाट होती. मी जेव्हा शाहरुखसोबत काम केले तेव्हा कळले की त्याला बॉलीवूडचा बादशहा का म्हणतात, त्याचे कारण तो बाकीच्या अभिनेत्यांपेक्षा फार वेगळा कलाकार आहे, आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही.”
दरम्यान, ‘डंकी’ च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले, तर शाहरुख खान आणि विकी कौशल सोबत, तापसी पन्नू आणि बोमन इराणी सारखे कलाकार यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. याचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर त्याची स्पर्धा प्रभासच्या ‘सालार’शी होणार आहे. अशा परिस्थितीत कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.