नवी दिल्ली – मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे देशभर संतापाची लाट सुरु असताना पश्चिम बंगालमध्ये महिलांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पश्चिम बंगालमधील मालदाच्या बामंगोला पोलीस स्टेशन हद्दीतील पकुहाट परिसरात दोन आदिवासी महिलांना नग्नावस्थेत आणि निर्दयीपणे बुटांनी मारहाण करण्यात आली असल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता यानंतर आता याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे समजते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिलांचे कपडे फाडून त्यांना अनेक महिला मारहाण करत असल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी या दोन महिलांना लाथा बुक्क्यांसह बेदम मारहाण करण्यात आली होती. आता या सर्व प्रकरणावर पोलिसांनी कारवाई केल्याचे समजते. याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा अधिक तपास अद्याप सुरु असल्याचे समजते.
काय घडलं होत त्यावेळी
दोन महिलांना चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांना स्थानिक महिला आणि दुकानदारांनी बेदम मारहाण केली. महिला चोरी करताना पकडल्या गेल्या. भीतीपोटी त्यांनी तक्रारही नोंदवली नाही, असे सांगण्यात येत आहे.
यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पश्चिम बंगालमधील सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.या घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.