गोपीचंद पडळकर : आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
बारामती- चाळीस-पन्नास वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतर देखील बारामतीचा सर्वसमावेशक विकास होऊ शकला नाही. येथील मतदार अद्यापही भयभीत आहे, त्यामुळे बारामतीत खऱ्या अर्थाने लोकशाही आहे असे मला वाटत नाही , लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असे असले तरी बारामतीत लोकशाहीची व्याख्या म्हणजे पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठी चालवलेले राज्य अशीच आहे, अशी टीका महायुतीचे उमेदवार भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी बारामती येथे केली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रथमच पडळकर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी भाजपचे नेते ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे, रंजन तावरे, भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, प्रशांत सातव ,जिल्हा उपाध्यक्ष ऍडवोकेट नितीन भामे, सुरेंद्र जेवरे, पांडुरंग कचरे ,राहुल तावरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर शुक्रवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बारामती नगरपरिषदे समोरील पटांगणात रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाचे 70 टक्के काम भाजप सरकारने केले आहे उर्वरित 30 टक्के काम करून घेण्यासाठी भाजपात आलो आहे.भाजपला मतदान करणार नाही अशी बिरोबा ची शपथ आपण घेतली होती या प्रश्नावर ते म्हणाले की, आत्तापर्यंत धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर इतर सरकारपेक्षा भाजप सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. सरकारवर आरक्षणप्रश्नी दबाव टाकण्यासाठी आपण अशाप्रकारच्या आणाभाका घेतल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- अजित पवारही आज अर्ज दाखल करणार
महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे बारामती शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महापुरुषाच्या पुतळ्यांना अभिवादन करून अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कन्हेरी (ता. बारामती) येथे सभा पार पडणार आहे.