Jagannathpuri temple : पुरी येथील जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी ओडिशा पोलिसांनी नऊ बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही बांगलादेशी नागरिकांना मंदिरात जाताना पाहिले. त्यांनी सिंहद्वार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.
पुरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एसपी सुशील मिश्रा म्हणाले, “आम्हाला काही गैर-हिंदू बांगलादेशी मंदिरात घुसल्याची तक्रार मिळाली. आम्ही नऊ बांगलादेशींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.” मंदिराच्या नियमांनुसार येथे फक्त हिंदूच प्रवेश करू शकतात. या मंदिरात बिगर हिंदूंनी प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींचे पासपोर्ट तपासले जात असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले. यावेळी त्यापैकी एक हिंदू असल्याचे निष्पन्न झाले. इतर पासपोर्टचीही चौकशी सुरू आहे. नऊपैकी चार जण मंदिरात घुसल्याचे एफआयआर तपासात उघड झाले आहे.
इतर पर्यटकांकडून देखील माहिती घेणं सुरु
पुरीचे अतिरिक्त एसपी सुशील मिश्रा यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांशी देखील बातचीत केली. आजूबाजूच्या इतर पर्यटकांना याबाबत काही माहिती होती का याबाबत देखील पोलीस तपासणी करत आहेत.