Bangladesh Train Accident : बांगलादेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या असून या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, किशोरगंजमधील भैरब येथे दुपारी मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक बसून हा अपघात झाला. अपघातातील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरबमध्ये हा अपघात झाला. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले की, मदतकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. रिपोर्टनुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनेक लोक ट्रेनखाली अडकले होते. अनेक जखमी डब्याखाली पडून होते. मात्र, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
वृत्तानुसार, सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकही मदत करत आहेत.