नवी दिल्ली – उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे गुरुवारी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा ढिगारा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि रात्री उशिरापर्यंत मार्गावरील वाहतूक पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
यामुळे 10 हजारहून अधिक यात्रेकरू अडकून पडले आहे.चमोली येथील छिंकाजवळ एक मोठी दरड कोसळली असून रात्री उशिरापर्यंत ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या भूस्खलनामुळे महामार्गाचा 100 मीटरचा भाग बाधित असून मोठी वाहतूक कोंडी झाली.
या महामार्गावर हजारो यात्रेकरू अडकले असून या यात्रेकरूंमध्ये बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे काम करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे रस्ता सुरु होण्यासाठी जास्तीचा कालावधी देखील लागू शकतो.
यात्रेकरू अडकले असले तरी ते सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्यांना अन्न आणि पाणी पुरवले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, चमोलीत बुधवारी रात्री मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झोडपून काढले होते.