वर्धा – वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या 11 कवट्या आणि 52 हाडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी आर्वी येथे अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता समोर आलेले दृश्य भयावह होते.
पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. आरोपी डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे 11 कवटी सदृश्य अवयव आणि 56 इतर अवयव सापडले आहेत.
अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदमला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला तेव्हा एका अल्पवयीन मुलीचा अधिकचे पैसे आकारून गर्भपात केल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी आर्वी पोलिसात देण्यात आली होती. या प्रकरणात मुलीसह आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपी डॉ. रेखा कदमला अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडे आणि कवट्या पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळूंके म्हणाले की सापडलेल्या अवशेषाबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच ठोस निष्कर्ष काढता येईल. कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत, याबद्दल पोलीस तपास करत आहेत. अटकेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांचीही कसून चौकशी सुरू आहे. या हॉस्पिटलला अधिकृत गर्भपात व गर्भनिदान केंद्राचा दर्जा आहे. मात्र, मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याची वैद्यकीय पध्दत असते. ती या दवाखान्यात पाळली की नाही याबाबत पोलीस साशंक आहेत.