पुणे – नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 50 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दुकानाचे मालक जुनेद अकबर कोल्हापुरवाला (29 ,रा.,गणेश पेठ,पुणे )व अदनान असिफअली सय्यद (19.रा.,गणेश पेठ,पुणे) यांचेविरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुख्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी त्यांचेकडील आदेश तसेच पर्यावरण संरक्षण कायदयानुसार प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक मांजाने पक्षी व मनुष्यास होणा-या इजा (दुखापत) पासुन सरंक्षण व्हावे याकरिता प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक पासुन बनविण्यात येणारा मांजाचा वापर करण्यास, जवळ बाळगण्यास बंदी घातलेली आहे.
बुधवारी गुन्हेशाखा युनिट -1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहरात गस्त घालुन प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक पासुन बनविण्यात आलेल्या मांजाची कोठे विक्री होते यांची माहीती काढत होते. तेव्हा बोहरी आळी, रविवार पेठ याभागातील एक दुकानदार चोरुन नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीसांनी दुकानात बनावट ग्राहक पाठवुन खात्री करुन छापा टाकला व दुकानातुन नायलॉन मांजाचे एकोणीस रिळ (बंडल) व रोख रक्कम असा एकुण 49,960 रुपयाचा माल जप्त केला.
प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक मांजाचे वापराने पक्षी व मनुष्यास गंभीर स्वरुपाच्या इजा दुखापती होतात त्यामुळे अशाप्रकारे मांजाची विक्री करु नये, जवळ बाळगु नये अन्यथा त्यांचेविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोणपे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उप-निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अशोक माने, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांनी केली.