– नंदिनी आत्मसिद्ध
जागतिक महासत्ता म्हटले की, डोळ्यासमोर अमेरिकेचे नाव येते. मात्र, जगप्रसिद्ध उद्योगपती वॉरन बफे यांनी अमेरिकेबाबत दिलेल्या इशाऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅंकेने व्याजदरवाढीच्या चक्राला स्थगिती देण्याचा संकेत दिला आहे. त्यामुळे भारतात असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांनी अमेरिकेत निधी ओतण्याऐवजी भारतातच निधी ओतण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. मागच्या सात सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे भारतात 11 हजार 700 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. चालू आर्थिक वर्षात त्यांनी आतापर्यंत 22 हजार 500 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर उतरणीस लागले असून, ते 75 डॉलर प्रतिपिंप इतके खाली आले आहेत. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत देशातील वित्त, वाहन आणि बॅंकिंग कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. अमेरिकेतील चलनफुगवट्याचा दर पाच टक्क्यांच्याच आसपास राहण्याची अपेक्षा आहे.
तसेच अमेरिकेतील समाधानकारक रोजगार आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर तेथील भांडवली बाजारात उत्साह संचारला आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत झाला असून, तेथील निधी मोठ्या प्रमाणावर भारताकडे वळला आहे. या सर्व कारणांमुळे, आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने 800 अंशांची, तर निफ्टीने 195 अंशांची उसळी घेतली. निफ्टीने तर 18,900 अंशांची महत्त्वपूर्ण पातळी गाठली.
अमेरिका व भारताच्या अर्थव्यवस्थांचे प्रतिबिंब दोन्ही ठिकाणच्या शेअर बाजारात पडत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना, त्यांनी चीनविरुद्ध व्यापारी युद्ध छेडले आणि भारतातून होणाऱ्या आयातीवरही काही निर्बंध लादले. बाहेरच्या देशांतून येणारी माणसे आणि माल यामुळे आमच्या बाजारपेठांवर आक्रमण होत असल्याची ट्रम्प यांची भूमिका होती. ट्रम्प यांनी अमेरिकेचा विकास केला, असे कोणीही म्हणत नाही.
अमेरिकेत आतापर्यंत 163 भारतीय कंपन्यांनी 40 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली असून, त्यामुळे तेथे सव्वाचार लाख रोजगार निर्माण झाले आहेत, असे नुकत्याच वॉशिंग्टन येथे प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नोंदवण्यात आले आहे. अमेरिकेतील भारतीय कंपन्या अमेरिकेत स्पर्धात्मकता, सामर्थ्य आणि लवचिकता आणतात, नवनवीन तंत्रज्ञान आणतात आणि स्थानिक समुदायांना सामावून घेतात. असे प्रतिपादन भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजितसिंग संधू यांनी नुकतेच एका समारंभात केले. भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत सर्वाधिक गुंतवणूक (9.8 अब्ज डॉलर) टेक्सासमध्ये केली असून, त्यानंतर जॉर्जिया, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, मॅसेच्युसेट्स, केंटकी, कॅलिफोर्निया, मेरीलॅंड, फ्लोरिडा आणि इंडियाना या प्रांतांचा नंबर लागतो. एका सर्वेक्षणानुसार, 85 टक्के भारतीय कंपन्यांनी येत्या काही वर्षांत अमेरिकेत यापेक्षाही अधिक गुंतवणूक करण्याची तसेच जादा कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखली आहे.
मात्र, या सगळ्यास एक काळी किनारही आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील काही बॅंका आणि वित्तसंस्था बुडाल्या आहेत. ठेवीदारांवर भीतीचे सावट पसरले आहे. बॅंकांमध्ये आपला पैसा सुरक्षित नाही, अशी भीती असंख्य ठेवीदारांच्या मनात निर्माण झाली आहे. याचा परिणाम उद्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला, तर त्याचा फटका भारतासही बसू शकतो. फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत सातत्याने वरच्या क्रमांकावर असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफे. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्याकडे 80 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. बफे हे बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी आहेत. ते 92 वर्षांचे असून, आजही ते अत्यंत सक्रिय आहेत. कोलंबिया बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी अर्थशास्त्रातली पदवी संपादन केली.
लहानपणी आजोबांच्या किराणा दुकानातही काम केले आणि खूप अल्पवयात त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. बर्कशायर हॅथवेच्या मालकीच्या साठहून अधिक कंपन्या असून, विमा, वित्तसल्ला, शेअर गुंतवणूक, बॅटरी निर्मिती आदी विविध क्षेत्रांत ते कार्यरत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या संदर्भात बफे यांनी अनेक पुस्तके लिहिली असून, त्यांच्यावरही बऱ्याचजणांनी पुस्तके लिहिली आहेत; परंतु बफे यांच्या मते, “अमेरिकी अर्थव्यवस्थेचा बहराचा काळ आता संपत आला आहे.’ 2008 नंतरच्या वित्तसंकटाप्रमाणे अमेरिकेतील बॅंकांसमोर त्यांनी इतरांना दिलेल्या कर्जाचे हप्ते थकित होण्याचा मोठा धोका आहे. उद्या बॅंकांची थकबाकी वाढल्यास, आर्थिक संकट आणखी गंभीर बनून एका पाठोपाठ एक बॅंका दिवाळखोरीत जातील, असा इशाराच बफे यांनी दिला आहे.
सिलिकॉन व्हॅली बॅंक, सिग्नेचर बॅंक आणि फर्स्ट रिपब्लिक बॅंक ही प्रकरणे ज्याप्रकारे हाताळण्यात आली, ती पद्धत पूर्णपणे चुकीची होती, अशी स्पष्टोक्ती बफे यांनी केली आहे. अर्थात, अमेरिकेतील बॅंका दिवाळखोरीत गेल्या, तरी ठेवीदारांनी काळजी करू नये. अमेरिकेच्या फेडरल डिपॉझिट इन्श्युरन्स कॉर्पोरेशनकडे त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. बॅंक बुडाल्यास, ग्राहकांना अडीच लाख डॉलर्सचा दावा मिळू शकतो, असेही ते म्हणतात; परंतु कोणतीही बॅंक बुडाल्यास, गुंतवणुकीबाबत अनिश्चितता निर्माण होत असते.
भारतातही गेल्या काही वर्षांत पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरण गाजले. भारतात 14 हजार कोटी रुपयांच्या सत्यम घोटाळ्यामुळे बाजार कोसळला होता. त्याचप्रमाणे वित्त क्षेत्रातील अनेक कंपन्यांची गैरव्यवहारांची प्रकरणे एकापाठोपाठ एक समोर आली. शिवाय देशात आता निवडणुकांचा मौसम सुरू झाला आहे. त्यामुळे सवंग आर्थिक निर्णय घोषित होऊन, तुटीचा कारभार सुरू होण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा उत्पादन तसेच आर्थिक क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊन, भांडवली बाजारासही धक्के पोहोचू शकतात. म्हणूनच सध्याच्या तेजीमुळे हुरळून जाण्याचे कारण नाही.