नारायणगाव (पुणे) -राज्यातील सर्व बेंजो पारंपरिक वादक कलाकारांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी बेंजो मालक व पारंपरिक वादक संघटना पुणे जिल्हा यांनी राज्य सरकारकडे शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून निवेदन देऊन केली आहे.
हे निवेदन संघटनेचे पदाधिकारी बबू कुटे, संतोष ओतूरकर, ओंकार गोसावी, अब्दुल पिंजारी, जैनुद्दीन इनामदार, संदीप गुंजाळ, बाळासाहेब गाढवे, मंगेश फाकटकर आदींनी दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने लग्नकार्य, मंगल कार्यालय यांना परवानगी दिली आहे; परंतु बेंजो व्यावसायिकांना परवानगी नसल्याने बेंजो मालक व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बेंजो या व्यवसायावर हजारो कलाकार अवलंबून आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न सध्या बेंजो मालकासह कलाकारांना पडला आहे. त्यामुळे राज्य शासनाने लग्नकार्यासाठी बेंजो व्यावसायिकांना नियमांच्या अधीन राहून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.
यासंदर्भात आमदार अतुल बेनके यांनी राज्य शासनाकडे वाद्य व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करून पारंपारिक वाद्य परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संघटनेचे पदाधिकारी याना आश्वासन दिले आहे.