मुंबई – राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ. कारभारी काळे हे सध्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरु डॉ. अनिरुध्द पंडित यांच्याकडे 28 मार्च 2021 रोजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.