मुंबई – पंजाब किंग्जने शनिवारी मुंबई इंडियन्सचा 14 धावांनी पराभव करत या मोसमातील चौथा विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने तुफानी फलंदाजी करताना 214 धावा केल्या. आणि यालाच प्रत्युत्तरात देत मुंबई इंडियन्सला केवळ 201 धावा करता आल्या. या सामन्यात पंजाबच्या अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली पण त्याच्या दोन चेंडूंवर बीसीसीआयला तब्बल 30 लाख रुपयांचा फटका बसल्याचं समोर आलं आहे.
अर्शदीपने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे अर्शदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत रंगतदार झालेला सामना पंजाबच्या बाजूने झुकवला. यावेळी अर्शदीपने 20 व्या ओव्हरमध्ये आपल्या स्पीडच्या जोरावर मुंबईच्या फलंदाजांना सलग 2 बॉलवर आऊट केलं. विशेष बाब म्हणजे अर्शदीपने हे दोन्ही बॉल इतक्या वेगाने टाकले दोन्ही वेळा मिडल स्ंटपचे 2 तुकडे झाले.
त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर टिळक वर्माला बाद केले. यावेळी चेंडू थेट मधल्या स्टंपला लागला आणि स्टंप मधेच तुटला. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने नेहल वढेरालाही त्याच पद्धतीने बाद केले आणि पुन्हा एकदा मधला स्टंप तुटला. एखाद्या गोलंदाजाचा मारा किती भेदक असू शकतो हे अर्शदीपने यावेळी दाखवून दिलं.
View this post on Instagram
दरम्यान, अर्शदीपच्या या कामगिरीवर सगळेच फिदा झाले असून बीसीसीआयला मात्र तब्बल 30 लाख रुपयांचा फटका बसला आहे. आयपीलच्या सामन्यांमध्ये जे स्टंप्स वापरले जातात त्याची किंमत जवळपास 25 ते 35 लाख या घरात असते. आपण अगदी एका सेटची किंमत 25 लाख रूपये जरी धरली तरीही अर्शदीपने दोनवेळा जी स्टंपतोड कामगिरी केली त्यामुळे एका मॅचमध्ये आयपीलचं 50 लाखांचं नुकसान झालं आहे असं म्हणता येईल.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या इंस्टाग्राम पोस्टवरून या स्टंप्स सेटची किंमत 30 लाख रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, LED लाईट लागलेल्या या स्टंपला हात किंवा चेंडू लागला तरी त्यामध्ये असलेले LED लाईट चमकतात. एवढंच नाही तर या स्टंप्समध्ये खास प्रकारचा माईक आणि कॅमेरा देखील लावण्यात आलेला असतो. त्यामुळे अंपायर्सना नेमकं काय घडलं आहे हे पाहून निर्णय देणं सुलभ होतं.