नवी दिल्ली – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) माजी अध्यक्ष पी.सी.मोदी यांची शुक्रवारी राज्यसभा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याआधी ती जबाबदारी सांभाळणाऱ्या पी.पी.के.रामाचार्युलू यांची तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बदली करण्यात आली.
राज्यसभेचे अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांनी भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) निवृत्त अधिकारी असणाऱ्या मोदी यांची नियुक्ती केली. त्यांना पुढील वर्षीच्या 10 ऑगस्टपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत कार्यकाळ लाभेल. त्यांच्या आधी राज्यसभा महासचिव असणाऱ्या रामाचार्युलू यांची 1 सप्टेंबरला त्या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या बदलीचे कारण नमूद करण्यात आले नाही. त्यांची नियुक्ती आता राज्यसभा सचिवालयात सल्लागारपदी करण्यात आली आहे.
चालू महिन्याच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्यसभा महासचिव बदलण्याची घडामोड घडली. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी त्या घडामोडीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मला कुठलेही आश्चर्य वाटले नाही. रामाचार्युलू पूर्णपणे पात्र, नि:पक्षपाती आणि व्यावसायिक वृत्तीचे होते. मोदी राजवटीत ते तिन्ही गुण पाप ठरतात, असे ट्विट त्यांनी केले.