वाराणसी – संत गुरू रविदास यांच्या जयंतीनिमित्त, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वाराणसी येथील रविदास मंदिरात लंगरसेवा दिली.
संत रविदास हे 15 ते 16 व्या शतकातील अध्यात्मिक परंपरेतील महान संत होते. त्यांची स्तोत्रे गुरू ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांना शीख धर्मातही मोठा मान आहे. त्यातील काही ओळीही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर प्रसारित करून संत रोहिदासांना त्यांनी अभिवादन केले. रविदास जयंती माघ पौर्णिमेला साजरी केली जाते.
उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारावर असलेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या जयंतीचे निमित्त साधत रविदास मंदिरात ही लंगरसेवा केली. यानंतर प्रियंका गांधी कानपूर कॅन्टोन्मेंट, किडवाईनगर येथे घरोघरी प्रचार करण्यासाठी रवाना झाल्या. तेथून त्यांनी शिसामाळ आणि आर्यनगर येथे घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. संध्याकाळी त्यांनी कानपूर येथील महिला मेळाव्यात भाषण केले.